अहंकाराचा खेळ
✍️ अनिल रुषी तुलकाने
भुकेल्या डोळ्यांमध्ये स्वप्नं जळती राखेसारखी,
आणि महालांत चालते चर्चा सोन्याच्या ताटांची।
माणुसकी हरवून बसली पैशाच्या बाजारात,
देव शोधती मंदिरात, दुःख उभं आहे रस्त्यात…॥
तहानलेल्या लेकराला थेंब मिळेना दुधाचा,
अन् मूर्ख माणूस खेळ मांडतो आपल्या अहंकाराचा…॥
जखमी काळजांना येथे कुणी फुंकर घालत नाही,
शब्दांनी प्रेम बोलती, पण मनात माया नाही।
भाकरीसाठी जीव येथे रोज तडफडतो आहे,
आणि सत्तेच्या खुर्चीवर माणूस हसत बसला आहे…॥
धर्माच्या नावाखाली पेटती द्वेषाची ज्वाला,
माणसानेच माणसाला दिला दुःखांचा प्याला।
अजून किती रडणार ही उपाशी लेकरं सारी?
कधी जागी होईल पुन्हा माणुसकी बिचारी…॥
एक दिवस येईल असा, सत्य आरसा दाखवेल,
अहंकाराच्या महालांना वेळ मातीमध्ये मिळवेल।
तेव्हा कळेल जगाला किंमत एका अश्रूची,
जो पडला होता शांतपणे भुकेल्या त्या लेकराची…॥
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा